खूप दिवसांपासून
काहीतरी पोस्ट करायचं होतं!
या आधी कधी
मराठीत पोस्ट नव्हतं केलं त्यामुळे जरा द्विधा मनस्थितीत होते. शेवटी आज करूनच टाकते
मराठीत पोस्ट. त्यानिमित्ताने का होईना बऱ्याच दिवसांनी,
नाही बऱ्याच वर्षांनी ब्लॉग वर ही Fountain
Pen पोस्ट!
मागच्या
आठवड्यात घरी गेले तर खास मला अभ्यासासाठी टेबल आवरून ठेवलेलं होतं. टेबल-खुर्ची. साधं
स्वच्छं लाकडी टेबल आणि खुर्ची. अगदी लहानपणापासून
मला टेबल-खुर्ची हा प्रकार खूप आवडतो. अगदी किरकोळ लिखाण किंवा साधीशी रोजनिशी देखील
इथे लिहिली तर समाधानी वाटतं. आवरलेलं टेबल,त्यावर छानसा एक पेन होलडर. त्यात
रंगीबेरंगी पेनं. अगदी फार नाही पण एक काळं,
एखादं नीळं
पेन, दोन चार पेन्सिली, हयलायटर.
टेबलावर एखादं छोटंसं पेपरवेट आणि समोर सॉफ्ट बोर्ड असेल तर त्यावर एखाद-दोन सुविचार.
स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले. एखादं चित्रं. कोपऱ्यात छान रचून ठेवलेली पुस्तकं.
हा! फारंच सोस आहे मला या सगळ्याचा.
लहानपणी माझं आणि ताईचं एक
टेबल होता होतं. त्याला छान ड्रॉवर, कपाट, दप्तराचा खण. बाबांनी खास
बनवून घेतलं होतं आमच्यासाठी. तेव्हा आवराआवरीचा इतका सोस नव्हता. त्यामुळे पुस्तकं
कपाटात कमी आणि टेबलावर जास्त असत. 'कचऱ्यातून कला' या सदराखाली किती चिरकूट गोष्टी
जमवलेल्या. नंतर कॉलेज साठी ठाण्यात आले आणि इथे माझं एक डेस्क होतं. माझ्या CAच्या पुस्तकांचा भार माझ्यापेक्षा त्या डेस्कनेच
पेलला. त्या सगळ्या मोड्यूलनी आणि रेफरन्स बुक्सनी आधी ते वाकलं, त्याला बाक आला आणि शेवटी 'शुक्ला-ग्रेवाल' या माझ्या लाडक्या पुस्तकाचं ओझं सहन नं होऊन ते डेस्क मोडलं. मग आमची स्वारी ताईच्या
टेबलावर. तिचं शिक्षण झालं म्हणून कब्जा केला तिच्या टेबलावर. आजोबा आणि बाबांनी स्वतः बनवलेलं हे टेबल. साधंसं
पण मस्त मजबूत. विकत घेतलेली डेस्क/टेबलं कालांतरानी डुग-डुगू लागली पण हे टेबल! बाबा, ताई… सगळ्यांचं इंजिनियरिंग, आजोबांचं संशोधन माझं CA, आता FRM…
सगळं काही सशक्तपणे पेलंत
आलंय हे टेबल.
तशी साधीशीच वस्तू पण
म्हणतात ना 'आपलेपणा' वस्तूंबद्दल ही वाटतो. That
unbeatable feeling of belongingness!
No comments:
Post a Comment